+91 9168584999     info@sbayurved.com


ग्रीष्म ऋतू (उन्हाळा)

किती गम्मत आहे नाही,सतत कधीच एक ऋतू राहत नाही. ऋतु सतत बदलत असतात. पृथ्वीच्या परीभ्रमणामुळे म्हणजे स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरण्याच्या गती मुळे ऋतुचक्र निर्माण होते. पृथ्वीच्या अव्याहत गती मुळे काळ पुढे सरकतो. कल्पना करा जर पृथ्वी फिरायची थांबून गेली तर ऋतु बदलणार नाही. एकच एक ऋतु, किती बोर नाही!!! पण असे कधी ही झाले नाही. त्यामुळेच आपल्याला एकामागून एक असे ऋतूंचे वैविध्य अनुभवायला मिळते. आणि यातून एक संदेश ही आपल्या सगळ्यांना मिळतो. तो म्हणजे थांबु  नका, चालत रहा, करत रहा. कारण जो चालत राहतो तोच परिवर्तन घडवून आणु शकतो. त्या कुठल्याशा प्रार्थनेत म्हंटले आहे ना "पाऊले चालो पुढे जे थांबले ते सम्पले", आणि जर या पावलांना  कवीवर्य बोरकरांच्या पावलांचे देखणेपण लाभले आणि ही पावले ध्यासपंथी लागली तर मग काय विचारता, असो ....

आपल्या इथे उन्हाळा खरं तर मार्च महिन्यापासूनच सुरु होतो ..तीव्र उन्ह पडते. पण यावर्षी म्हणावा तसा उन्हाळा पडलाच नाही. उन्हाळा आपल्याला आठवतो ते म्हणजे आंब्याचा रस, मोगऱ्याच्या सुवास, कूलरची हवा, शाळेच्या सुट्या, आत्या मामा काका कडे रहायला आलेली बच्चे कम्पनी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सकाळ दुपार ते थेट संध्याकाळ पर्यंत उन्ह उन्ह आणि उन्ह. पण यावर्षी अगदी पाच सहा दिवसांपूर्वीपर्यंत उन्हाळ्याची म्हणजे ग्रीष्म ऋतूची सगळी लक्षणं दिसत नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून तीक्ष्ण उन्ह पडते  आहे. उत्तरायण।चा हा प्रकर्षकाल आहे.

covid च्या संकटाने आपल्या सगळ्यांना या गोष्टी ची जाणीव प्रकर्षाने करून दिली आहे की आपल्याला निरोगी रहायचे असेल तर आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये दिलेल्या ऋतुचर्या व दिनचर्या म्हणजे जीवनशैली चे पालन करणे आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. आणि म्हणूनच ग्रीष्म ऋतुबद्दल महिती देण्याचा माझा हा प्रयत्न.

शिशिर वसंत ग्रीष्म हे तीन ऋतु उत्तरायणात  येतात. म्हणजे या वेळी सूर्य उत्तरेकडे सरकतो किंवा पृथ्वीच्या गतीमुळे उत्तर गोलार्धात सूर्याची किरणं सरळ पडतात. त्यामुळे ती अधिक तीव्र असतात. हे जग अग्नी सोमीय आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर या काळात वातावरणातील सोम शक्तीचा ऱ्हास होऊन तेज शक्ती प्रबळ असते. त्यामुळे सर्व चरचरतील आप्य धातु म्हणजे जल महाभूताचा क्षय झालेला असतो, शोषण झाले असते. आणि त्यामुळे कडु तिखट आणि तुरट  या रुक्ष रसान्चा  जास्त प्रकर्ष असतो.

म्हणुनच या ऋतुत तिखट,कडु आणि तुरट   रसान्चे सेवन कमी करावे, व इतर तीन म्हणजे मधुर आंबट व खारट रस सेवन करावे. हे तिन्ही रस ज्या पदार्थात असतात म्हणजे गोड आंबट आणि खारट अशी पदार्थ सेवन करावी.असे कुठले पदार्थ आपल्या आहारात असतात बरं ?

तर तुमच्या लक्षात येईल की सगळी सरबत या तीन रसानी मिळून बनलेली असतात. लिम्बु,आंबा आवळा कोकम या सर्व आंबट फळांनी बनलेली मीठ आणि साखर किंवा गुळ घातलेल्या सरबतांचे सेवन या ऋतुत सांगीतले आहे. त्याने अतिरिक्त उन्हाने शरीरातील जो अप्यान्श कमी झाला आहे तो भरून निघतो.

पण या वर्षी ग्रीष्म ऋतु confuse करणारा आहे. कडकडीत उन्ह पडत नाही, मधेच आभाळ भरून येत. एखादी सर पण येते. मधेच उन्ह पडतं, आत्ता सकाळी हे लिहीत असताना सुद्धा आकाशात उन्ह अजिबात नाही. पाऊस येईल की काय असे वातावरण झाले आहे. तेव्हा अशा वातावरणात आपला विवेक वापरुनच ग्रीष्म ऋतु चर्या करावी. कारण ही सगळी श्रावण मासातील वर्षा ऋतूंचि लक्षणं आहेत. आणि श्रावण महिन्यात अग्नी म्हणजे digestive power कमी झालेला असतो त्यामुळे जल महाभूत प्रधान सरबत पिऊन अग्नी अजुन मंद करणे अपेक्षित नाही, तर सुंठ मिरे यांसारख्या दीपन औषधांनी तयार युष म्हणजे सुप किंवा तत्सम गरम स्निग्ध,पातळ  पदार्थ घ्यावेत. पण ज्या दिवशी कडकडीत उन्ह आहे त्या दिवशी विविध सरबतांचे  सेवन अवश्य करावे.

वसंत सरला आला  ग्रीष्म

उष्ण उन्हाने पेटवले रण

शोषूनी अम्बु चरचरतील

आग ओकतो हा नारायण

तप्त धरा ही त्रुषार्त झाली

फुलुनी आले उत्तरायण  

पाण्यासाठी आकाशी

पक्षीगण करती वणवण

मंद सुगंधित मोगऱ्याच्या

सुगंधाने भरले अंगण

आम्रबनातून साद घालुनी

कोकीळ पक्षी करतो गायन  

वगैरे वगैरे....

वरील चार ओळी मी गेल्या दोन महिन्यापासून मनात साठवून ठेवल्या होत्या. पण दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने या वर्षी असा कडक उन्हाळा पडलाच नाही. आणि आज सकाळी तर नागपुरात चक्क पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ग्रीष्म ऋतु बद्दल न लिहिता सरळ वर्षा ऋतु बद्दल लिहावं असं एकदा वाटून गेलं. पण मित्रांनो हा पाऊस म्हणजे काही पावसाळा नाही बरं का ? आपल्या देशात मान्सून हा जुनच्या महिन्यात येतो. सध्या पडणारा पाऊस हा  बंगालच्या उपसागरवरुन येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणारा तसा अवकाळी पाऊस आहे. आणि म्हणुनच वाऱ्याची स्थिती बदलली की परत उन्ह येणार.

आणि या लेखातून ज्या गोष्टी बद्दल सांगायचे आहे ती  तर सध्या जगतव्यापी समस्या आहे. ती समस्या ग्रीष्म ऋतुत अधिकच प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे उष्णतेची. भारतातील हवामानात 80% लोकाना उष्णतेचा त्रास होतो. आणि जे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा जे ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने पृथ्वीचे तपमान वाढून (global warming ) त्याचा शरीरावर होणारा परिणाम म्हणूनही उष्णतेचे त्रास होतात. यामध्ये हाता पायांच्या तळव्याची आग होणे, तोंडाला फोड येणे नाक फुटणे म्हणजे नाकातून रक्त येणे, चेहऱ्यावर फोड येणे, पायाच्या तळव्याना भेगा पडणे, आम्लपित्त वाढणे असे त्रास होतात. यासाठी उष्णता कमी करणारी चंदन, प्रवाळ, अनंतमूळ, गैरीक यांसारखी औषधं तसेच चंद्रकला रस, औदूम्बरवलेह, चन्दनासव यांसारखी सुंदर कल्प आयुर्वेदात सांगितली आहे. वैद्यांच्या सल्याने अवश्य सेवन करावे. बरेचदा इतर काही त्रास जसे मुव्याधी,म्लपित्त अगदी सांध्याचे व्याधी, त्वचाविकार हे देखील उष्णतेशी निगडीत असतात आणि फक्त उष्णता कमी केली की बरे होतात.

उष्णतेशी निगडीत एक interesting कल्प आयुर्वेदात सांगितला आहे. ते म्हणजे शतधौत घृत. म्हणजे शंभर वेळा धुतलेले तुप. मुळातच तुप हे पित्तशामक. आणि त्यात ते शंभर वेळा पाण्यातून धुतल्याने जास्तच शीत होते. आणि असे तुप हे ताम्ब्याच्या भांड्यात तयार केले जाते. आणि "संस्कारो नाम गुणांतराधानाम" अर्थात ज्याच्या सन्सर्गाने गुणांमध्ये परिवर्तन घडून येते त्याला संस्कार असे म्हणतात. तेव्हा ताम्र पात्राचा आणि पाण्याचा संस्कार तुपावर होऊन ते फूगते आणि अत्यंत शीत होते. असे तुप रात्री झोपताना पायाला चोळले तर उष्णता कमी होते, आग कमी होते, भेगा बऱ्या होतात. हे तुप उत्तम स्निग्ध असल्याने moisturizer प्रमाणे देखील वापरता येते.

इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केल्यावर  आपसूकच त्यांच्या काही चांगल्या वाईट गोष्टींचे अनुकरण भारतीयांनी केले. त्यांच्या चालीरीती, त्यांची शिक्षण पद्धती, भाषा आणि अशा किती तरी गोष्टी आपल्या समाजात आपोआपच झिरपत गेल्या, रुजत गेल्या. एकोणिसाव्या शतकात antibiotics आणि anti oxidants च्या शोधाने क्रांती केली. भारतातील संक्रमण व कुपोषण या दोन्ही गंभीर समस्यांवर यशस्वीरित्या मात करता आली. आणि हळु हळु भारतीय वैद्यकीय क्षेत्राला पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीने व्यापले. नवीन शोधांचा स्विकार करणे आणि त्याचा मानव जातीच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे कधीही स्वागतार्ह आहे. आणि यासाठी allopathy चे योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. पण आजच्या काळात  corona सारख्या संकटाशी लढताना आपण आयुर्वेदीय चिकित्सा पद्धतीचा अवलम्ब करण्याची गरज आहे. corona सारखे सुक्ष्म जीव येतील आणि जातील पण जर आपलं शरीर सक्षम असेल तरच आपण अशा संकटातून सुटका करून घेऊ शकतो. आणि त्यासाठी आयुर्वेदीय जीवनशैली ला पर्याय नाही. बरेच विषयांतर झाले. शतधौत  घृतावरुन बराच इतिहास फिरून झाला. पण यांसारख्या कल्पाचा सगळ्यांना परीचय होऊन ती कल्प आत्मसात केली गेली पाहीजे असं मनापासून वाटतं.

मागे सांगितल्याप्रमाणे ग्रीष्म ऋतुत मधुर आम्ल आणि लवण रसान्चे सेवन केले पाहीजे. त्यासाठी आंबा या फळाबद्दल लिहिलं नाही तर हा लेख पुर्ण होणार नाही असं वाटतं. तर कच्चा आणि पिकल्या आंब्याचे गुणधर्म वेगळे आहेत.

कच्चा आंबा हा उष्ण असतो पण जर आगीत भाजून गुळ किंवा गाठी घालून त्याचं पन्हे केलं तर ते अत्यंत शीतल आहे. उष्माघात म्हणजे उन्ह लागल्यावर औषधाप्रमाणे काम करतो. तसेच कच्ची कैरी ही उष्ण असली कैरीची पुदिना घालून केलेली चटणी किंवा कांदाघालून केलेलं लोणचं या ऋतुतील म्ल रसाची पूर्ती करते. तसेच उन्हाळ्यात एकंदरच आदान काल असल्याने भाज्या ई. सुद्धा बेचव असतात, त्यामुळे कैरीचे कांदा पुदिना यासोबत केलेल्या चटण्या, लोणची, मेथाम्बा हे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवतात.

पक्व आंबा हा मधुर म्हणुन बृहण तर्पण त्रुप्तीदायक वातशामक  असा आहे. आपल्या कडे मिळणाऱ्या पिकलेल्या आंब्यामुळे मात्र कधीकधी पोट खराब होते, gases, द्रव मल प्रव्रुत्ती असे त्रास होतात. पण मग आंब्याचा रस खायचाच नाही का ? आंब्याच्या रसाने उन्हाळ्यात निसर्गतः होणारी झीज भरून निघते. आणि vitamines पण मिळतात. म्हणुनच आंब्याचा रस नक्की खावा. पण त्यात साजुक तुप आणि चिमूट भर सुंठ टाकावी. म्हणजे मग रस बाधत नाही.


"यश क्लिनिक " वैद्या रसिका देशपांडे

 स्नेह नगर, नागपूर, 9689743960


 

Share this blog

Share blog on whatsapp

Join our newsletter. Get info on the latest updates.


© 2021,Copyrights Brahmachaitanya. All Rights Reserved

This site is managed by Dr. Shrikant Hadole
E-commerce Application Development